* आमदार संजय केळकर यांचा आरोप
* ठामपा आयुक्तांची विविध समस्यांवर घेतली भेट
ठाणे: ठाणे शहरात जागोजागी फेरीवाल्यांचे साम्राज्य असून लोकांना चालण्यासाठी पदपथ आणि रस्ते राहिलेले नाहीत. या व्यवसायातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असून ते जपण्यासाठी फेरीवाला धोरण जेवढे जे लांबवता येईल तेवढे लांबवले जात असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.
आमदार संजय केळकर यांनी आज मंगळवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. शहरात जागोजागी गॅस शेगड्या ठेवून बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय केले जात आहेत. त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती आहे. रस्त्यारस्त्यावर आणि पदपथांवर फेरीवाल्यांचे बस्तान असून फेरीवाल्यांकडून मध्यस्थांमार्फत लाखाचे हफ्ते गोळा केले जात आहेत. हे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी फेरीवाला धोरण लांबवले जात असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला. याबाबत आयुक्तांशी चर्चा केली असून ठराविक मुदतीत फेरीवाला धोरण राबवण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही श्री.केळकर यांनी म्हटले.
ढोकाळी येथे मल्टीपर्पज सेंटरसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून हे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यात जिम, आरोग्य केंद्र, सामाजिक कार्यांसाठी सभागृह अशा सुविधा देण्यात येणार आहेत. मालमत्ता विभागाकडे अनेक मालमत्ता असून त्याचा ताबा मात्र भलत्यांकडेच आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाची आठवडाभरात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली आहे. ठाण्यातील कलादालन सध्या बंद अवस्थेत असुंब्याचे नुतनीकरण करून कलर म्युझियम सुरू करण्याची मागणी केली असून आयुक्तांनी ती मान्य केल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
ठाणे शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये राज्य आणि केंद्राकडून येत असतात. मात्र त्याचा योग्य वापर होत नसून त्यात भ्रष्टाचार होत आहे. तलाव सुशोभीकरणासाठी २० कोटी रुपये महापालिकेला मिळाले असून या कामावर माझी करडी नजर असेल, असा इशाराही श्री.केळकर यांनी दिला आहे.
ठाणे शहरात गरीब-गरजू रुग्णांसाठी ४४ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात येणार आहेत. भविष्यात हा आकडा ६८वर जाणार आहे. परंतु आपला दवाखाना या योजनेचा अनुभव पाहता आरोग्य मंदिरांचा आकडा मोठा आणि सेवा कुचकामी ठरू नये, अशी सूचना करत श्री.केळकर यांनी आरोग्य मंदिरांचे कठोरपणे संचालन आणि नियंत्रण प्रशासनाचे असावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
बंद पडलेल्या आपला दवाखाना योजनेबाबत श्री.केळकर यांनी टीका केली. आयुक्तांशी झालेल्या चर्चेत या योजनेतील कर्मचाऱ्यांचे पगार आणि जागेचे भाडे दोन दिवसांत संबंधितांच्या खात्यात जमा होणार असल्याचेही ठरले. यावेळी दिव्यांगांसाठी वसतिगृह, धर्मवीरनगरमधील इमारतींची दुरुस्ती, आणि इतर समस्यांवरही चर्चा करण्यात आली.