इजा-बिजा इंग्लंडची, तिजेत दक्षिण आफ्रिकेचा बदला?

मुंबईतील ट्रॅफिक जॅमसारखंच, आयसीसी स्पर्धेतील इंग्लंड–दक्षिण आफ्रिका सेमीफायनलही आता एक ‘रूटीन’ झाला आहे. नॉकआउट फेरी म्हणजे या दोन संघांसाठी जणू ठरलेलं ‘मीटिंग पॉईंट’च बनलं आहे. 2017 आणि 2022च्या एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत, तसेच 2023 आणि 2024च्या टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत हे संघ आमने-सामने आले होते. आणि आता सलग चौथ्या वर्षी, पुन्हा एकदा, यावेळी गुवाहाटीतील 2025 आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांचा सामना रंगणार आहे.

गेल्या काही लढतींकडे पाहता, इंग्लंडने सम-वर्षांत (2022, 2024) विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेचा आनंदाचा क्षण विषम वर्षात (2023) आला. आता पुन्हा एकदा विषम वर्षात सामना होत असल्याने, प्रोटिज पुन्हा नशिबाचा पाला आपल्या बाजूने फिरवू शकतील का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

पण गुवाहाटी दक्षिण आफ्रिकेसाठी अजूनही ‘शुभ’ ठरलेले नाही. या विश्वचषकात येथे खेळलेल्या एकमेव सामन्यात, त्यांनी इंग्लंडविरुद्ध केवळ 69 धावांवर गारद होऊन 10 गडी राखून पराभव पत्करला होता. असा धक्कादायक पराभव अनेक संघांचे मनोबल खच्ची करू शकतो, पण लॉरा वुल्वार्टच्या नेतृत्त्वाखालील आफ्रिकन संघाने शानदार पुनरागमन केले. सलग पाच सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली.

आता पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये हा रोमहर्षक सामना रंगणार आहे. प्रश्न एवढाच, त्या जुन्या पराभवाच्या जखमा अजून ताज्या आहेत का, की दक्षिण आफ्रिका इंग्लंडकडून बदला घेण्यास सज्ज आहे? वुल्वार्टसमोर हे मोठं आव्हान असेल. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी तिला आणि तिच्या संघाला चमत्कारिक खेळ करावा लागेल.

या स्पर्धेत तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी वुल्वार्ट पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचणार आहे. गेल्या तीन पैकी दोन सामन्यांत तिने अर्धशतक झळकावले. 2017मध्ये तिच्या संयमी 66 धावांमुळे आफ्रिकेने स्पर्धात्मक 218 धावा केल्या होत्या, पण शेवटच्या षटकात इंग्लंडने दोन गडी राखून विजय हिसकावला होता. वुल्वार्टसोबतच सुने लीस, मारिझान काप आणि क्लोई ट्रायॉन या अनुभवी खेळाडूंच्या त्रिकुटावरही सर्वांची नजर असेल. या तिघी 2017 आणि 2022च्या उपांत्य फेरीत खेळल्या होत्या. मात्र यावेळी त्या, त्या दुःखद आठवणींना ‘इतिहासात रूपांतरित’ करण्यास कटिबद्ध असतील.

इंग्लंडसाठी सोफी एक्लस्टन पुन्हा एकदा ‘प्लेअर टू वॉच’ ठरणार आहे. 2022मध्ये या 6 फूट उंच डावखुऱ्या फिरकीपटूने सहा विकेट्स पटकावून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर असणारी ही गोलंदाज पुन्हा एकदा लक्ष वेधल. मात्र न्यूझीलंडविरुद्ध खेळताना झालेली दुखापत तिची परीक्षा घेऊ शकेल. कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट आणि माजी कर्णधार हेदर नाइट यांच्या जोडीमुळे इंग्लंडचा फलंदाजी विभाग अजूनही अत्यंत मजबूत आहे. 2017मध्ये इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या नाइटचा अनुभव आणि सिव्हर-ब्रंटची सातत्यपूर्ण कामगिरी, या दोन्हींच्या आधारावर चारवेळा विजेता असलेला इंग्लंड पुन्हा एकदा प्रबळ दावेदार ठरतो.

तथापि, या इंग्लंड–दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये एक जुना ‘प्रतिस्पर्धी’ पुन्हा व्यत्यय आणू शकतो आणि तो म्हणजे पाऊस! हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारी 25% आणि संध्याकाळी 55% पावसाची शक्यता आहे. त्यामुळे टॉस निर्णायक ठरू शकतो. डकवर्थ-लुईस पद्धत लक्षात घेता, दोन्ही कर्णधारांचा प्रथम गोलंदाजी करण्याकडे कल असू शकतो.

या विश्वचषकात गुवाहाटीमध्ये झालेल्या चार सामन्यांपैकी दोन वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. इंग्लंडने येथे दोन्ही सामने धावांचा पाठलाग करत जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही कर्णधारांसमोर द्विधा मनःस्थिती असेल — धावांचा पाठलाग करावा की धावफलकावर मोठी धावसंख्या उभी करावी?

अनेक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेची विश्वचषक कहाणी आशा, हुरहूर आणि अपूर्ण स्वप्नांनी भरलेली आहे. इंग्लंड नेहमीच त्यांच्या मार्गातील अडथळा ठरला आहे. पण खेळात इतिहासाला उलथून टाकण्याची ताकद असते. येत्या बुधवारी, गुवाहाटीच्या ढगाळ आकाशाखाली, दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा इंग्लंडकडे डोळस नजरेने पाहील. या वेळी भूतकाळाचा भार नको, तर इतिहास रचण्याची भूक घेऊन.

आमने-सामने
एकूण: इंग्लंड – 36, दक्षिण आफ्रिका – 10
विश्वचषकात: इंग्लंड – 7, दक्षिण आफ्रिका – 2
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: इंग्लंड – 2, दक्षिण आफ्रिका – 4

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 29 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार