कसारा जीप ओमिनी वाहनतळावर वाढती गुंडगिरी

कसारा: मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाबाहेर असलेल्या जीप-ओमिनी-इको वाहनतळावर स्थानिकांची नित्याची दादागिरी वाढत आहे. या ठिकाणी बरेच वाहनचालक वडिलोपार्जित जागा असल्याप्रमाणे आपली वाहने आडवी-तिडवी बेशिस्तपणे उभी करीत असतात. त्यामुळे या वाहनतळावर प्रत्येक लोकल ट्रेनवेळी वाहतुकीचा नित्याचा खोळंबा पहायला मिळतो.

येथून हाकेच्या अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ही नागरी वस्ती आहे. या विभागातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, बाजारहाट करणा-या गृहिणी, वृद्ध व्यक्ति, गरोदर माता आणि रुग्ण यांचे या रोजच्या ट्राफिक जाममुळे प्रचंड हाल होतात. या एकमेव रस्त्यावरुनच आंबेडकर नगरप्रमाणेच बारा बंगला, पाटीलवाड़ी, ठाकुरवाड़ी या विभागातील रहिवाशांना देखील मार्गक्रमण करावे लागत असते. रेल्वे सुरक्षा रक्षक अनेकवेळा सौम्य कारवाई करतात, परंतु पुन्हा परिस्थिति ‘जैसे थे’ पहावयास मिळते.

कसारा-नाशिक दरम्यान धावणारी असंख्य वाहने ही मुदतबाह्य अर्थात भंगारात टाकण्याजोगी झाली असतानाही बिनधोकपणे चालविली जात आहेत. स्वत:च्या रोजी रोटीसाठी असंख्य प्रवाशांच्या जीविताशी खेळणा-या या वाहन मालक-चालकांवर नियंत्रण आणणे गरजेचे असताना वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.