बोनस-वेतनापोटी ठामपावर पडणार १५० कोटींचा बोजा

ठाणे: मागील वर्षी ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचारी तसेच परिवहन (टीएमटी) सेवेतील कर्मचाऱ्यांसह पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देणाऱ्या महापालिका प्रशासनाने अजूनही बोनस जाहीर न केल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी वेतन आणि सानुग्रह अनुदान देऊन गोड करण्यासाठी पालिकेवर १५० कोटींचा बोजा पडणार असल्याने ऐन दिवाळीत पालिकेचे दिवाळे निघणार आहे.

मुंबईलगत असलेली ठाणे महापालिका ‘ब ‘ वर्गात मोडते. राज्याचा शकट हाकणाऱ्या धुरीणांपैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दिग्गज ठाण्यातील आहेत. त्यामुळे, कर्मचाऱ्यांना दिवाळीत भरघोस बोनसची अपेक्षा आहे. महापालिकेने सन २०२३ साठी २१,५०० रुपये इतका बोनस दिला होता. तर गतवर्षी २४ हजार इतके सानुग्रह अनुदान दिले होते. यंदा अनेकजण सेवानिवृत झाल्याने ठाणे महापालिकेत सुमारे ६००० कर्मचारी, शिक्षण विभागाचे ६९५ कर्मचारी, परिवहन विभागाचे १३०० कायम कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या ३७० इतकी आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागात रस्ते सफाईसाठी असलेल्या कंत्राटी कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण संबंधित कंत्राटदारामार्फत करण्यात येणार आहे.

बोनसमुळे, ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर भार पडणार आहे. सानुग्रह अनुदानापोटी सुमारे २३ कोटी, पगारापोटी ११५ कोटी तर घनकचरा साफसफाई विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ कोटी असा सुमारे १५० कोटींचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडणार असल्याने ऐन दिवाळीत पालिकेचे दिवाळे निघणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४९२ आशा सेविकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी गेली काही वर्षे  दिवाळी भाऊबीज भेट दिली जाते. या अनुषंगाने २०२२ मध्ये ५००० भेट दिली होती, २०२३ आणि २०२४ साली प्रत्येकी ६ हजार रुपये इतकी रक्कम भेट म्हणून देण्यात आली होती. त्यामुळे यंदा आशा सेविकांच्या दिवाळी भेटीचा अतिरिक्त बोजाही पालिकेवर पडणार आहे.