विद्यार्थ्यांच्या बस १२ तास वाहतूक कोंडीत अडकल्या!

* विद्यार्थ्यांनी अन्न पाण्याविना काढली रात्र
* घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या बंदीचा फटका

ठाणे: ठाणे-घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामांसाठी अवजड वाहनांना घातलेल्या बंदीचा फटका अखेर मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांना बसला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या १२ बस तब्बल १२ तास अडकून पडल्या. संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या या गोंधळात तहान-भुकेने शेकडो विद्यार्थी व्याकूळ झाले.

मुंबईतील दादर परिसरातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहा बस आणि मालवणी भागातील विद्यार्थ्यांच्या सहा बस अशा १२ बस वाहतूक कोंडीत अडकल्या. यावेळी तब्बल १२ तास हे विद्यार्थी अन्न-पाण्याविना वाहतूक कोंडीत अडकले. दादरमधील नामांकित शाळेतील विद्यार्थी वज्रेश्वरी येथील द ग्रेट एस्केप वॉटर पार्कमध्ये पिकनिकसाठी गेले होते.

दादर ते द ग्रेट एस्केप वॉटर पार्क यामध्ये ७० किलोमीटरचं अंतर आहे. याशिवाय या प्रवासासाठी अडीच ते तीन तास लागतात. मात्र सायंकाळी ४.३० वाजता वॉटर पार्कमधून निघाल्यानंतर त्यांना घरी पोहोचायला दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडली. ही मुलं बुधवारी सकाळी ६ वाजता दादरला पोहोचली. या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

संध्याकाळी पाच वाजल्यापासून विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले होते. ढिसाळ वाहतूक नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या १२ बस वाहतूक कोंडीत अडकल्या. वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असताना वाहतूक पोलीस मात्र गायब होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच प्रत्युत्तर नसल्याची माहिती आहे. रात्रभर विद्यार्थी पाणी-अन्नाविना बसमध्ये बसून होते. संपूर्ण रात्र त्यांनी बसमध्ये बसून घालवली.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असतानाही एमबीव्हीव्हीचे वाहतूक पोलीस घटनास्थळी दिसले नाहीत. ठाणे-घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामांसाठी अवजड वाहनांना घातलेल्या बंदीचा फटका अखेर सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसला. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांसह बसपर्यंत पोचून विद्यार्थ्यांना पाणी आणि खाण्यासाठी बिस्किटे उपलब्ध करून दिली. तसेच वाहतूक कोंडीतून बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.