कडोंमपा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला मनसेने घातला चपलांचा हार

कल्याण पूर्वेतील पाणीप्रश्नी मनसे आक्रमक

कल्याण : कल्याण पूर्वेतील नागरिक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. ड प्रभाग क्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीला मनसेने घोषणाबाजी करत चपलांचा हार घातला.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून वारंवार आश्वासन देण्यात येते, मात्र पाणी मिळतच नाही. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांच्यासमवेत प्रभाग कार्यालयात जाऊन आंदोलन केले. कल्याण पूर्वेतील पाणी समस्या लवकर सुटली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

कल्याण पूर्वमध्ये गेले काही महिने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. कल्याण पूर्व परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कल्याण पूर्वमधील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता लोकसंख्येप्रमाणे महानगरपालिका पाणी देण्यास कमी पडत आहे. तसेच नागरिक ज्या पद्धतीने कर व पाणीपट्टी भरत आहेत, त्याप्रमाणे नागरिकांना मिळणाऱ्या सुखसोयी कमी आहेत. तोंडावर आलेली दिवाळी पाहता लोकांना मुबलक पाणी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे. पुढील सात दिवसांत पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी यावेळी दिला.