नवी मुंबई: दिवाळी सणाला आप्त स्वकीयांना भेटवस्तू दिल्या जातात. याआधी मिठाई भेट दिली जात होती. मात्र मिठाई लवकर खराब होत असल्याने आता सुका मेवा भेट म्हणून दिला जात असल्याने बाजारात सुक्या मेव्याला मागणी वाढली आहे.
आरोग्यवर्धक म्हणून सुका मेवा खात असले तरी आता दिवाळीत सुका मेवा भेट देण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे व्यायसायिक बाजारात महिनाभर आधीच सुक्या मेव्याची आगाऊ ऑर्डर देतात. त्यामुळे सध्या एपीएमसी बाजारातील सुक्या मेव्याच्या मागणीत अधिक वाढ झाल्याने बाजारात काजू बदाम, पिस्ता, मनुके, खारीक, अक्रोड यांचे दर गेल्या वर्षीच्या मानाने दहा ते वीस टक्क्यांनी वाढलेले आहेत. खुल्या सुक्या मेव्याबरोबरच भेट म्हणून देण्यासाठी लागणाऱ्या सुक्या मेव्याच्या गिफ्ट खोक्यांना देखील बाजारात मोठी मागणी आहे.
सुक्या मेव्याचे सरासरी दर
किरकोळ (रु.) घाऊक (रु.)
बदाम ८००-१४०० ७३०-१२००
काजू ७००-१२०० ७५०-१५००
पिस्ता १०००-१२००. ८००-१०००
आक्रोड१०००-२२०० १०००-२०००
अंजीर ७५०-१४०० ६५०-१२००
खारीक २५०-४०० २५०-३००
जर्दाळू ६००-९०० ५५०-८००
चारोळी.८००-१४०० ७००-१२००
मनुके ३५०-७०० ३००-६००
दुग्धजन्य मिठाई लवकर खराब होत असल्याने दिवाळीत भेट म्हणून सुक्या मेव्याला अधिक पसंती आहे. त्यामुळे दरात वाढ होऊन देखील सुक्या मेव्याला मोठी मागणी आहे. बाजारात काजू, मनुके वगळता इतर सुका मेवा परदेशातून दाखल होत असून दिवाळीची मागणी पाहता आम्ही सुका मेवा लवकरच आयात करतो, अशी माहिती व्यापारी विश्वनाथ मार्ढेकर यांनी दिली.