शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष अजित पवार गटात

अंबरनाथ: अंबरनाथ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटात सहकाऱ्यांसह प्रवेश करून शरद पवार गटाला जबरदस्त धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सदाशिव पाटील यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सदाशिव पाटील यांचे स्वागत करून त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली.

ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस किसन तारमळे आदी याप्रसंगी उपस्थित होते. सदाशिव पाटील यांच्यासोबत शहर महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रमोद बोऱ्हाडे आणि इतर कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संघटनेला आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्का बसला आहे.