घोडबंदरची पाणीटंचाई; मनसेने घेतली आयुक्तांची भेट

ठाणे: करोडो रुपयांचे फ्लॅट खरेदी करूनही घोडबंदर पट्ट्यातील रहिवाशांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. बहुतांश सोसायट्यांना टँकरपोटी महिन्याला लाखो रुपये मोजावे लागत आहे. या गंभीर प्रश्नावर मनसेचे नेते अविनाश जाधव आणि घोडबंदरमधील रहिवासी यांनी मंगळवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणली.

घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असून या मोठ्या प्रमाणात मोठमोठी गृहसंकुले देखील उभी राहिली आहेत. पालिकेकडून इमारती उभारण्यासाठी परवानगी दिली जाते, मात्र याचा बोजा सोयीसुविधा पुरवताना होत असून पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून देखील घोडबंदर विभागातील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. मंगळवारी त्रासलेल्या घोडबंदर भागातील रहिवाशांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या समवेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना ही गंभीर समस्या सांगितली. पालिका आयुक्तांनी यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरी, यामागे मोठा टँकर घोटाळा असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.

घोडबंदरसाठी १४४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. ठाणे महापालिकेकडून जवळपास ११० एमएलडी पाणीपुरवठा होतो. केवळ चार एमएलडी पाणीपुरवठा कमी होत असताना नेमके हे पाणी चोरीला जाते कुठे असा प्रश्न अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न घोडबंदरच्या रहिवाशांना देखील पडला असल्याचे या रहिवाशांचे म्हणणे आहे.

घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरु असून या ठिकाणी एकही टँकर दिसत नाही. मग या बांधकामांना पाणी कुठून दिले जाते. याशिवाय पालिकेचा टँकर मागवला कि रहिवाशांना हजार रुपये मोजावे लागतात. मात्र खाजगी टँकर मागवला की अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. जर एकाच ठिकाणी टँकर भरला जात असेल तर ही तफावत का? असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.