निसर्ग उद्यान परिसरातील प्रकार
ठाणे: कळव्यातील निसर्ग उद्यान परिसरात कृत्रिम तलाव न बांधता लोखंडी टाक्या बसवण्यात आल्या आहेत. असे असताना या ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आल्याचे भासवण्यात आले असून कृत्रिम तलावाचे बिल काढण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली असून देयक अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी मनसेने आहे.
न्यायालयाच्या निर्णयानुसार सहा फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे,असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वच प्रभाग समितीमध्ये कृत्रिम तलाव बांधण्यात आले. कळव्यातही दोन ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यासाठी २० लाखांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. कृत्रिम बनण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने कृत्रिम तलाव तयार न करता लोखंडी टाक्या बसवून आता कृत्रिम तलाव बनविले असल्याचे बोगस बिल ठामपा प्रशासनास सादर केले आहे.
गणेशोत्सवादरम्यान गणेश मूर्ती, नवरात्रीत देवी विसर्जन तसेच छटपूजेच्या विधीसाठी महापालिकेमार्फत कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात येते. कळवा प्रभाग समिती अंतर्गत खाडी किनारी असलेल्या निसर्ग उद्यान परिसरात गणपती विसर्जनाकरिता १८ लाख रुपये खर्च करून कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम ठेकेदाराला दिले होते. या ठेकेदाराने कृत्रिम तलाव बनविल्याचे भासवून ठाणे महापालिकेला बिल सादर केले आहे. सदर कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप पाचंगे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व महापालिकेची फसवणूक करणाऱ्या संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संदीप पाचंगे यांनी सार्व. बांधकाम विभागाचे प्रशांत सोनाग्रा यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेने खुलासा करताना बिलाला कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात आली नसल्याचे सांगितले. कृत्रिम तलावाचा प्रस्ताव रद्द करण्यात आलेला आहे. त्याऐवजी लोखंडी टाक्या बसवण्यात आल्या असून कृत्रिम तलावाचे बिल देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.