वाडा: भिवंडी-वाडा या निकृष्ट महामार्गाने १९ वर्षीय निष्पाप तरुणाचा नाहक बळी घेतला आहे. ही घटना बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या घडलेल्या अपघाताची वाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. स्मित आगिवले (१९) असे या बळी गेलेल्या तरूणाचे नाव असुन तो वाडा तालुक्यातील पीक येथील रहिवाशी आहे. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. या घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
स्मित आगिवले हा तरूण वाडा तालुक्यातील वसुरी येथील”ब्लू स्टार कंपनीत दुचाकी घेवून कामाला जात होता. वाडा-भिवंडी महामार्गावरील खुपरी गावच्या हद्दीतील प्रशांती हॉटेलजवळ जागोजागी खड्डे पडलेले आहेत. शिवाय हा रस्ता अत्यंत निकृष्ट व निसरड्या बनलेल्या रस्त्यावर तरुणाची दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला. याचवेळी दुचाकीमागून आलेल्या कंटेनरखाली तरुण सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
तरूणाचा बळी हा ठेकेदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.