स्टाॅल घोटाळ्यातील कनिष्ठ अभियंत्याला अटक

भाईंदर: महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अथवा परवाना विभागाची कोणतीही परवानगी नसताना फास्टफुड आणि ज्यूस सेंटर व इतर गटई कामगार स्टॉलला भुईभाडे आकारणी केल्याचे मार्च 2024 मध्ये निदर्शनास आले. यात तत्कालीन अधिकाऱ्यांच्या सह्या बनावट आढळल्याने २० जून २०२४ रोजी गुन्हा भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल झाला. वर्षभराच्या कालावधीनंतर या प्रकरणी कनिष्ठ अभियंता शैलेश शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे फास्टफुड आणि ज्युस सेंटर व इतर स्टॉलला परवाना देण्यात येतो. त्यानुसार स्टाॅल धारक विविध ठिकाणी स्टाॅल लावून व्यवसाय करीत असतात. या प्रकरणी काही स्टाॅल परवाना प्रकरणात कनिष्ठ अभियंता शैलेश शिंदे यांनी आर्थिक व्यवहार करुन तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक खांबित व उप अभियंता चेतन म्हात्रे यांच्या स्वाक्षरीच्या संचिका सापडल्याचे आढळले. तदनंतर या संचिका कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांना दाखविण्यात आल्यानंतर संचिकेवरील स्वाक्षऱ्या त्यांच्या नसून बनावट असल्याचे निदर्शनास आले. एकूण १६ स्टाॅल परवान्याच्या बनावट दस्तऐवज प्रकरणी पालिका कर्मचारी योगेश घरत यांच्या तक्रारीनुसार भाईंदर पोलीस ठाण्यात २० जून २०२४ रोजी कनिष्ठ अभियंता शैलेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिंदे यांना निलंबित करण्यात आले. मात्र मागील आठवड्यात पुन्हा कामावर हजर करून घेतले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर शैलेश शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. स्टाॅल घोटाळ्यातील प्रकरणी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मागील वर्षी सुमारे १४ स्टाॅलचे परवाने रद्द केले होते. आता या स्टाॅल घोटाळा प्रकरणी सुत्रधार पोलिसांच्या हाती लागल्याने स्टाॅल घोटाळ्यात मास्टर माईंड कोण? याबाबत पालिकेत चर्चा सुरू आहे.