उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून संदेश पाटील यांनी घेतली शपथ

ठाणे: ठाण्याचे रहिवासी असलेले ज्येष्ठ अनुभवी वकील संदेश पाटील यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली.

मूळचे सांगलीचे असलेले संदेश पाटील हे गेली २६ वर्षे वकिली पेशात कार्यरत आहेत. १९९९ पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. घोडबंदर येथील ते रहिवासी असून चरई विभागात त्यांचे अनेक वर्षांपासून कार्यालय आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून बीकॉम, एलएलबी, एलएलएमचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. आतापर्यंत ४००० पेक्षा अधिक खटले त्यांनी हाताळलेले आहेत. क्रिमिनल, सिव्हिल खटल्यांमध्ये अनुभवी वकील म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सीबीआय, एनआयए, ईडी, एफसीए, एसआरए या केंद्रीय संस्थांसाठीसुद्धा त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.