टेम्पो-टँकर अपघातात एकाचा मृत्यू, दोघे जखमी

ठाणे: नितीन कंपनीकडून घोडबंदर मार्गाकडे जाणारा तीन चाकी टेम्पो कॅडबरी नाका येथे उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती.

बबलू असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे तर आलम शेख (२९)आणि डॅनियल नाईक (५६) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. काल रात्री ११.४५च्या दरम्यान कॅडबरी नाका येथे घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर पाण्याचा टँकर उभा होता. नितीन कंपनीकडून त्याच मार्गावर एक भरधाव वेगात तीन जणांना घेऊन जाणारा मालवाहू तीन चाकी टेम्पो टँकरवर आदळला. या अपघातात तीन जण टेम्पोमध्ये अडकले होते.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पोत अडकलेल्या तीन जणांची सुटका केली. त्यामधील गंभीर जखमी असलेल्या बबलू याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास वर्तकनगर पोलिस करत आहेत.