ठाणे परिवहन विभागातर्फे सेवा प्रणाली विकसित
ठाणे: नागरिक व वाहनधारकांना पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि त्वरित सेवा मिळाव्यात या उद्देशाने ठाणे परिवहन विभागामार्फत ठाणे क्षेत्रासाठी विविध सेवा प्रणाली विकसित करण्यात आलेल्या आहेत. या नव्या प्रणालींमुळे ठाणे विभागातील रस्ते अपघात कमी होण्यास, कर महसूल वाढण्यास व वाहतूक व्यवस्थापन सुकर होण्यास मदत होणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगींनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ८ सप्टेंबरपासून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध नागरिकाभिमुख सेवा व प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सेवांमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात सोयी उपलब्ध होणार आहेत. ही सेवा प्रणाली ठाणे क्षेत्रात यशस्वी ठरल्यास ती राज्यभर वापरण्यात येईल, अशी श्री.सरनाईक यांनी दिली आहे.
ब्लॅक स्पॉट ॲलर्ट सिस्टीम हे जीओ लोकेशनवर आधारित ॲप वाहनधारकांना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट्सबाबत पूर्वसूचना देईल. यामुळे अपघात प्रवण क्षेत्रात चालक/प्रवासी यांना त्वरित माहिती मिळून अपघात टाळता येतील. विशेषत: या ॲप द्वारे महिलांसाठी वूमन हेल्पलाईन नंबर आणि आपत्कालीन रुग्णवाहिका, पोलिस अग्निशमन दल इत्यादी सेवांचा थेट वापर करता येईल. व्हॉट्सॲप क्विक सर्व्हिसेसच्या माध्यमातून नागरिकांना 8080129800 या क्रमांकावर व्हॉट्स ॲपद्वारे वाहनविषयक सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच, वाहन नोंदणी तपशील, कर भरणा, फिटनेस, परवाना, टॅक्स इत्यादी सेवांबाबत त्वरित माहिती मिळणार आहे. नागरिकांना वेळ आणि श्रम वाचवणारी ही जलद सेवा असेल.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे कर थकबाकीदार वाहनांचा मागोवा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी टॅक्स डिफॉल्टर वेहिकल मॉनिटरिंग सिस्टम या प्रणालीचा परिवहन विभागाला फायदा होईल. तसेच या प्रणाली अंतर्गत शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे माहिती संकलित करून वाहन शोध प्रक्रिया गतीमान करणे शक्य होणार आहे.
नॉन यूज वेहिकल्स मॉनिटरिंग सिस्टम या प्रणालीचा उपयोग करून वाहनधारकांनी वापरात नसलेल्या वाहनांची योग्य माहिती शासनाला देता यावी म्हणून लोकेशन बेस्ड ट्रॅकिंग सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या सेवा प्रणालीद्वारे चुकीची माहिती देऊन परिवहन विभागाने करचुकवेगिरी टाळण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. या सर्व सुविधा आर.टी.ओ. ठाणे संवाद प्रणाली या एकाच डॅशबोर्डवर एकत्रित उपलब्ध करण्यात आल्या आहेत.