अमृतजल तलावात ९० तासांत होते पीओपी मूर्तींचे विघटन

अमोनियम बाय कार्बोनेटचे द्रावण परिणामकारक

अंबरनाथ: प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेश मूर्तींच्या विघटनासाठी अमोनियम बाय कार्बोनेट द्रावणाच्या विशेष अमृत जल तलावाची अंबरनाथमध्ये रोटरी क्लब आणि अंबरनाथ नॉर्थ नगरपालिकेच्या माध्यमातून निर्मिती करण्यात आली आहे. या तलावात पीओपी मूर्तींचे अवघ्या ७२ ते ९० तासांत विघटन होत आहे. मागील तीन वर्षांपासून हा प्रयोग सुरू करण्यात आला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

रोटरी क्लब आणि अंबरनाथ नगरपरिषद यांच्या माध्यमातून निर्सगप्रेमी राजेश भवसार यांनी गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी अंबरनाथ शहरात सहा ठिकाणी अमृत जल तलाव उपक्रम राबवला आहे. बदलापूर, लोणावळा, पेण या ठिकाणी देखील प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात आला आहे. अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रावणात पीओपी गणेश मूर्तीचे सहज विघटन होत असल्याने जल प्रदूषण तसेच गणेश मूर्तींची विटंबना रोखण्यासाठी मदत होणार आहे. नागरिकांनी गणेश मूर्ती घरी नेताना सोबत मुर्तीच्या अर्ध्या वजनाचे अमोनियम बायकार्बोनेट घरी घेऊन गेल्यास गणरायाचे घरच्या घरीच विसर्जन करता येईल. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

या रासायनिक द्रावणात पीओपी मूर्तीचे विघटन झाल्यानंतर त्यापासून अमोनियम सल्फेट हे द्रव्यखत निर्माण होते, त्याचबरोबर तळाशी शिल्लक राहणारा कॅल्शियम कार्बोनेट याचा उपयोग खडू तयार करण्यासाठी होतो, अशी माहिती भावसार यांनी दिली.

अंबरनाथ, बदलापूर आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या तसेच १० रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थ रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यंदा अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने ग्रीनसिटी, कानसई, मोरीवली पूर्व- पश्चिम, कैलासनगर खदान, हरिओम पार्क, शिवगंगानगर परिसरात उपक्रम राबविला आहे. पाणी आणि एक टन अमोनियम बाय कार्बोनेटचे मिश्रण पालिकेने उपलब्ध करून दिले असल्याचे राजेश भावसार यांनी सांगितले.