फौजदार पदासाठी २५ टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
मुंबई : राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी आहे. शासनाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आलेली ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मेहनती आणि अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या परीक्षेमुळे कमी वयातच पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळून पोलिस दलात तरुण आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलिस कर्मचाऱ्यांचे करिअर नव्या उमेदीने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक पदासाठी 25 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती.
साधारणपणे पोलिस कॉन्स्टेबलना प्रमोशनद्वारे पोलिस उपनिरीक्षक पद मिळते ते त्यांच्या सेवाकालाच्या शेवटच्या टप्प्यात. अशावेळी त्यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून फारतर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांना कमी वयातच पदोन्नती मिळाल्याने त्यांना पुढील 20 ते 25 वर्षे पोलिस उपनिरीक्षक तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते. यामुळे पोलिस खात्यात नव्या उमेदीचे, तरुण पोलिस उपनिरीक्षक जोश आणि ऊर्जा घेऊन कार्यरत होतील.
या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसेच तरुण पोलिस अंमलदारांसाठी पोलिस उपनिरीक्षक पदाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. अन्यथा, त्यांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली असती. आता विभागीय परीक्षा त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी नवे दार उघडेल.