* १९,२०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन
ठाणे: “मेडिसिटी” हा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प असून या मेडिसिटीमध्ये विविध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रिसर्च सेंटर्स, वैद्यकीय शिक्षण संस्था आणि इतर आरोग्य सुविधांचा समावेश असणार आहे. या मेडिसिटीच्या निर्माणासाठी मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईतील ऐरोली येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ, कॅपिटालँड इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर खैतानी, कॅपिटालँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत नागपूर येथे 350 खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी ७०० कोटींपर्यंतची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे रोजगाराच्या तीन हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ते म्हणाले की, देशाची 60 टक्के डेटा सेंटर क्षमता एकट्या महाराष्ट्रात उभी राहिली आहे. आज महाराष्ट्र शासन आणि कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत सुमारे रु.19,200 कोटींची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून, कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट आणि महाराष्ट्रातील त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच या करारामुळे अंदाजे रोजगाराच्या थेट 60 हजार संधी देखील उपलब्ध होणार आहेत. या करारांतर्गत मुंबई आणि पुणे येथे बिझनेस पार्क्स, मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स, संपूर्ण महाराष्ट्रात लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्क्स हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
त्यासोबतच मेपल ट्री सोबत तीन हजार कोटींचा करार केला असून त्या माध्यमातून ते आपल्याकडे काही लॉजिस्टिक पार्क्स तयार करणार आहेत. आज अतिशय महत्त्वाचे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी पूर्ण केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस शेवटी म्हणाले.
यावेळी सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग म्हणाले की, नवी मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचे डिजिटल केंद्र बनत आहे, आणि मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळूरू यांसारख्या शहरांसोबत हे केंद्र भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करीत आहे. भारतात सध्या 800 दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आणि मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम आहे. त्यामुळे, डेटा सेंटरची मागणी पुढील काळात झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातील डेटा सेंटरची क्षमता सध्याच्या 1.2 गिगा वॅटवरून 2030 पर्यंत 4.5 गिगा वॅटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कॅपिटालँडने महाराष्ट्र सरकारसोबत विविध प्रकल्पांमध्ये, जसे की बिझनेस पार्क्स, लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक करार केला आहे. यामुळे कॅपिटालँड पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा (सुमारे 16 हजार 600 कोटी रुपये) जास्त गुंतवणूक करेल.