बाप्पाच्या विसर्जनात पादचारी पुलाचे ‘विघ्न’

१८ फुटांवरील मूर्तींसाठी कोलशेत खाडीवर विसर्जन व्यवस्था

ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावरील नव्याने उभारलेल्या पादचारी पुलाची उंची १८ फुट असल्याने पारसिक खाडीकडे विसर्जनासाठी जाणार्‍या गणपतीच्या मार्गात अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पारसिक खाडीवर १८ फुटांवरील गणेशमूर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे. या १८ फुटांहून मोठ्या मूर्ती असणार्‍या मंडळांना कोलशेत खाडीकडे जावे लागणार आहे.

ठाण्यातील पारसिकनगर येथील खाडीवर दरवर्षी उंच सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन केले जाते. सुसज्ज घाट आणि मोकळा परिसर असल्याने त्याठिकाणी ठाण्यासह आसपासच्या उपनगरांमधील उंच मूर्तींचे विसर्जन होते. ठाणे शहरासह वागळे इस्टेटसह मुलुंड, विक्रोळी, भिवंडी, घोडबंदरवरील अनेक गणेशमूर्तींचे पारसिक खाडीवर विसर्जन केले जाते. मात्र यंदा मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा येथील लोढा व रुस्तमजी कॉम्प्लेक्स परिसरात नवीन पादचारी पूल उभारल्याने या मार्गावरून मालवाहतूक करणार्‍या १८ फुटांवरील अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे १८ फुटांवरील गणपती मूर्तींना देखील पारसिक खाडी येथे विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे.

विसर्जनासाठी प्रशासनाने ठाण्यातील कोलशेत खाडी येथे पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजित केले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी माजिवडा मार्गे कोलशेत खाडी येथे उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेसह वाहतूक शाखेने केले आहे. या कोलशेत विसर्जन घाटासाठी पर्यायी मार्ग आणि व्यवस्थेच्या नियोजनाबाबत पालिका प्रशासनासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखा उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.