ठामपाची शिक्षण व्यवस्था कोलमडली-काँग्रेस

ठाणे: ठाण्यात शिक्षण व्यवस्थाच कोलमडली असुन विद्यार्थी व शिक्षक उपाशी आणि सरकार मात्र तुपाशी असल्याचा आरोप ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.

शाळांची दुरावस्था झालीच आहे, त्याचबरोबर एकही शालेय योजना धड सुरू नसून महायुती सरकारने विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांपासुन देखील वंचित ठेवत एकप्रकारे ठाण्यात शिक्षणाचा खेळखंडोबा केला असल्याचा आरोप करत काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष ॲड.विक्रांत चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले आहे.

ठाणे शहर काँग्रेसने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील शिक्षण समिती तसेच मनपा व खाजगी, अनुदानित व विनाअनुदानीत शाळांच्या विविध समस्या तसेच सरकारच्या अपयशी धोरणांबाबत वाचा फोडली. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक जे. बी. यादव, रविंद्र कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख, शिरीष घरत, संगीता कोटल व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले. ठाणे मनपा क्षेत्रामध्ये एकूण ७६९ खाजगी अनुदानित, विनाअनुदानित व मनपा शाळां असुन त्यात ९५ प्राथमिक तर ७ माध्यमिक अशा एकुण १०२ शाळा ठाणे महापालिकेच्या तर २०९ खाजगी अनुदानित आणि ५६० विनाअनुदानित शाळा आहेत. २०१४ साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारने शिक्षण समितीमार्फत कारभार हाकण्यास सुरुवात केली. मात्र, तेव्हापासुनच शैक्षणिक अधोगती सुरु झाल्याकडे विक्रांत चव्हाण यांनी लक्ष वेधले.

ठामपा शाळांच्या एकूण ७६ इमारतीपैकी सद्यस्थितीत ६९ इमारती कार्यरत असुन उर्वरीत ७ शाळांची दुरवस्था बनल्याने विद्यार्थ्याना जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागते. ठाणे महापालिकेला ३५९ कोटी ३४ लाख इतके अनुदान प्राप्त होते, तरीही विद्यार्थी व शिक्षकांच्या हाती काहीच येत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला असून स्वतः मुख्यमंत्र्यानीच या अव्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.