जुन्याच प्रभाग रचनेवर फिरवला वरवरचा हात!
ठाणे: मागिल तीन वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची चिन्हे असून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे. हा प्रारूप आराखडा मंगळवारी नगर विकास खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
वॉर्डांची संख्या वाढवण्याबरोबरच नगरसेवकांची संख्या काही प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली असून ठाणे महापालिकेत पुन्हा १३१ नगरसेवकच बसणार असल्याचे निश्चित झाले आहे.
प्रभागाच्या सीमा काही ठिकाणी कमी जास्त करण्यात आल्या असल्या तरी प्रभाग रचनेत फारसे बदल न करता प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
ही प्रभाग रचना तयार करताना प्रत्यक्ष प्रभागात जाऊन सीमांकन करण्यात आले आहे, परंतु प्रभाग संख्या ३३ इतकीच ठेवण्यात आली असून ३२ वॉर्डमध्ये चारचे पॅनल तर एका वॉर्डमध्ये तीनचे पॅनल असल्याची माहिती पालिकेच्या सूत्राने दिली आहे.
प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह इच्छूक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्राथमिक कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेवरून प्रभागांचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले होते. ही प्रभाग रचना तयार करताना जनगणनेनेची प्राप्त माहिती, प्रत्यक्ष स्थळाची पाहणी, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे, प्रभागाच्या हद्दी जागेवर जाऊन तपासणे या प्रक्रिया करण्यात आल्या.
२०१७ मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग रचना होती त्याच पद्धतीने नव्याने नवा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या निवडणुकीत २०११ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. मतदार संख्या वाढणार असली तरी चार सदस्यांंचे ३२ आणि तीन सदस्यांचा एक असे ३३ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख येथून सुरू होऊन शेवटचा प्रभाग दिव्यातील तीन सदस्यीय पॅनल असेल. त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर २०१७ प्रमाणेच १३१ नगरसेवकच पुन्हा सभागृहात बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२१ ऑगस्ट: प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता
२ ते ८ सप्टेंबर: प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती
९ ते १५ सप्टेंबर: पुन्हा नगर विकास खात्याकडून निवडणूक आयोगाला आराखडा सादर होणार
१६ ते १७ सप्टेंबर; अंतिम आराखडा नगरविकास खाते निवडणूक आयोगाला पाठवणार
३ ते ६ ऑक्टोबर: अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार