मुंबई महापालिकेने केली दंडात्मक कारवाई
मुंबई : ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.
एका ठिकाणी घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार, तसेच आस्थापनांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याचबरोबर खार येथून साकीनाका येथील मिठी नदी परिसरातील कचरापेटीबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकणाऱ्या एका कॅटररवरही मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
एका विभागातील कचरा दुसऱ्या विभागात आणून टाकणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाई हाती घेतली आहे. त्याअंतर्गत घोडबंदर मार्ग, ठाणे येथील आयडीएफसी बँक लिमिटेडवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आणि तो कचरा रात्री-अपरात्री इतर भागांमध्ये नेऊन टाकणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार, तसेच आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करावी. तसेच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते.