* रविवारी ठाण्यात ‘अर्पण’ची गुरू-शिष्य परंपरेची तेरावी मैफल
* पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया यांची पं.विवेक सोनार यांच्याकडून पाद्यपूजा
ठाणे: विवेक सोनार यांच्या गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात युनियन बँक आणि अस्मि इंटेरियरच्या मदतीने भारतीय संगीत परंपरेला समर्पित अनोखी मैफल रविवार २७ जुलै रोजी डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी १० वाजता सादर होणार आहे. त्या निमित्ताने ठाण्यात प्रथमच १७५ बासरी वादक एकाच मंचावर गुरु हरिप्रसाद चौरसिया यांचे समोर बासरी वादन करणार आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारी आणि नवोदित कलाकारांना मंच देणारी गुरुकुल प्रतिष्ठान ही संस्था यंदा ‘अर्पण’ची तेरावी मैफल घेऊन आपल्या वार्षिक संगीत महोत्सवासाठी सज्ज झाली आहे.
हा कार्यक्रम केवळ संगीताचा आनंद देणारा नसून, तो गुरु-शिष्य परंपरेचं दर्शन घडवणारा, संस्कारांची जोपासना करणारा आणि परंपरा व नावीन्याचा सुरेख संगम साधणारा आहे. पं. विवेक सोनार यांनी आपल्या सांगीतिक वाटचालीत अनेक टप्पे पार करत गुरू पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या पावलावर पाऊल ठेवत ‘गुरूकुल’ संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले आहे.
गुरुकुल प्रतिष्ठानच्या १७५ बासरीवादक शिष्यांची सामूहिक प्रस्तुती रागदारी आणि जुन्या-नव्या गाण्यांचा समन्वय, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा पाद्यपूजन सोहळा आणि पं. विवेक सोनार यांचं बासरी वादन असा कार्यक्रम होणार आहे.
संस्थेचे अनेक विद्यार्थी देशभर ही परंपरा पुढे नेत असून, कार्यक्रमात पं. विवेक सोनार यांच्या शिष्यांचे शिष्यदेखील सादरीकरण करणार आहेत.
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठान च्या कविता सोनार यांनी केले आहे.
पं. विवेक सोनार हे पद्मविभूषण असून हरिप्रसाद चौरसिया यांच्या ज्येष्ठ शिष्यांपैकी एक असून, भारतीय बासरीवादनाच्या परंपरेत त्यांचं वेगळं स्थान आहे. त्यांनी देश-विदेशात अनेक प्रतिष्ठित मैफलींमध्ये बासरी वादन सादर केले आहे. तंत्र, भावना आणि साधना या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली आहे. गुरूंचा वारसा पुढे नेत त्यांनी गुरुकुल शैलीत शिक्षण दिलं पाहिजेया उद्देशाने ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ची स्थापना केली. बासरीला समर्पित असा ‘बासरी उत्सव’, आणि ‘फ्ल्यूट सिम्फनी’ या अनोख्या संकल्पना मूर्त स्वरूपात आणणारे ते तरुण बासरीवादक आहेत.