काँग्रेसचा हल्लाबोल
ठाणे: कोट्यवधी रुपयांचा खर्च करून स्मार्ट सिटीच्या नावाखाली मासुंदा तलाव परिसराचे केलेले सुशोभिकरण पाण्यात गेले आहे. येथील लावलेल्या रेलिंग, काचेचा पदपथ, एलईडीची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षाने केला आहे.
ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आले. स्टील रेलिंग, एलईडी रोषणाई, काचेचे पदपथ, बैठक व्यवस्था अशा ‘हाय-फाय’ सोयीचा गाजावाजा झाला. पण आता, या सर्व सुविधांची धुळधाण उडाल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान डोळ्यांत झणझणीत खुपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली.
काँग्रेसने स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षा पट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला. पिंगळेंनी तत्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी, अशी मागणीही काँग्रेसने यावेळी लावून धरली आहे. या पाहणीवेळी शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, शहर उपाध्यक्ष बाबू यादव, ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, ब्लॉक कार्याध्यक्ष नूर्शिद शेख, युवक काँग्रेसचे लोकेश घोलप, अमोल गांगुर्डे, विलास महाडेश्वर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.