तळीरामांची उतरवली झिंग; नाकाबंदीत १११ जण ताब्यात

ठाणे: गटारीपूर्वीच ठाण्यातील पोलिसांनी तळीरामांची चांगलीच उतरवली असून नाकाबंदीत 111 मद्यपी जाळ्यात सापडले आहेत. आता त्यांच्यावर थेट न्यायालयात कारवाई होणार आहे.

गटारी अमावस्या गुरूवारी आल्याने तळीरामांचा हिरमोड झाला खरा, पण अनेकांनी बुधवारचा मुहुर्त साधत मांसाहारी जेवणावर ताव मारला आहे. तळीरामांनी मात्र गुरुवारीही दारूचे मनसोक्त सेवन केले. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही बाब दिसून आली आहे.

वाहतूक पोलिस विभागाने बुधवारच्या रात्री उशिरापर्यंत 111 तळीरामांना कायद्याचा दणका दिला आहे. अशा नशेखोरांमुळे गेल्या काही महिन्यापासून अनेकांचे ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये बळी गेले आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी गटारीच्या मुहुर्तावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 18 वाहतूक उपविभागात ठिकाठिकाणी बॅरिकेटींग करून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालकाची कसून तपासणी केली गेली. यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्यातर्गत वाहतूक पोलिसांची दोन अशी एकूण 35 पथके तैनात करण्यात आली होती. ठाणे वाहतूक पोलिसांची 550 कर्मचाऱ्यांची टीम तयार केली होती.

शहरातील अनेक हॉटेल्स व परमीट बारमध्ये मद्यपी व खवय्यांची गर्दी वाढू लागल्याने पिऊन धिंगाणा घालणाऱ्या ठाणे पोलीस, वाहतूक पोलीस संयुक्तपणे कारवाई केली. ही कारवाई अशाच पद्धतीने पुढेही सुरु राहणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

युनिटनुसार केलेली कारवाई

ठाणे : 22
वागळे इस्टेट : 23
भिवंडी : 8
कल्याण : 23
उल्हासनगर : 35