सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा

मुंबई: आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता ‘फ्रंटलाइन वर्कर’ होणार आहेत.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे शासनाच्यावतीने या सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रही दिले जाणार आहे. ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. त्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

अलिकडच्या काळात सर्पमित्रांची वानवा जाणवत असताना अचानक सध्या त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्ष साप पकडल्यानंतर त्या कामाची थेट बातमी सोशल नेटवर्कींगसाइट्सवर झळकते. सर्पमित्रांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असली तरी त्यामध्ये प्रशिक्षित सर्पमित्रांची संख्या अधिक दिसत नाही. त्यामुळे, काहीवेळा सर्पमित्रांना साप पकडताना गंभीर दुखापतही झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.