नवीन सॅटीस पुलाच्या गर्डरसाठी मिळाला मुहूर्त

ठाणे: ठाणे पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वेवरील नवीन सॅटीस पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामाला अखेर रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असून २६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे कोपरी पुलावरील वाहतूक काही तासांसाठी बंद ठेवली जाणार आहे.

ठाणे पूर्व स्थानकाचा परिसर कोंडीमुक्त करण्यासाठी स्मार्ट सीटीअंतर्गत महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प कोपरी सॅटीस २ हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. अंतीम टप्प्यात आलेल्या या प्रकल्पाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडून किमान १४ तासांचा मेगा ब्लॉक हवा आहे. तशी मागणीही ठाणे पालिकेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती, त्याला दोन दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली असल्याने या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

ठाणे स्थानकातून दररोज सुमारे नऊ ते दहा लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकाच्या पश्चिम भागात सॅटीसची उभारणी करण्यात आली आहे. या सॅटीसमुळे स्थानक परिसरातील वाहतुकीला शिस्त लागली नसली तरी कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्मार्ट सीटीअंतर्गत कोपरी येथे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा म्हणजेच सॅटीस- २ प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. नियोजनानुसार हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण रेल्वेच्या जागेत हा प्रकल्प होणार असल्याने विविध कामांसाठी शासकीय परवानग्या यासाठी मोठा कालावधी त्या कमी लागला. अडचणींचा सामना करीत एसएमसी या ठाण्यातील कंपनीने हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आणला असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी काही वर्षांपुर्वी करण्यात आली. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे याठिकाणी खांबांवर गर्डर टाकणे शक्य होत नव्हते. या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे १४ मेगाब्लाॅक देण्याची मागणी केली होती. त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचे नियोजन आखले आहे. ४६ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद गर्डर असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. हे काम तीन मोठ्या क्रेन, ५० अधिकारी-कर्मचारी आणि रेल्वे, महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती एसएमसी या कंत्राटदार कंपनीचे संचालक सुहास मेहता यांनी दिली. हे काम २६, २७ आणि
२९ जुलै रोजी दुपारी २ ते दुसऱ्या दिवशी ११ वाजेपर्यंत आणि २८, ३०, जुलै आणि १, २, आणि ३ ऑगस्ट दरम्यान रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत हे काम केले जाणार असल्याची माहिती कंपनीचे समिर फणसे यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले असून ठाणेकरांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

असा आहे प्रकल्पाचा आराखडा

तुळजा भवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैयानगर, एमजेपी कार्यालयापर्यंत एकूण २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. यात १२ मीटर रुंद मार्गिका असून स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी नऊ हजार चौरस मीटर डेक उभारणी करण्यात येणार आहे. डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात स्थानक इमारतीचाही समावेश आहे.