गेल्या आठवड्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. भारताने द्विपक्षीय टी-20 मालिकेत (दोन पेक्षा जास्त सामने असलेल्या मालिका) पहिल्यांदाच इंग्लंडला हरवून इतिहास रचला. या दौऱ्याचा पुढील अध्याय लिहिण्यासाठी, भारत बुधवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडशी भिडेल. साउथहॅम्प्टनमधील रोझ बाउलमध्ये हा ‘डे-नाईट’ सामना रंगेल.
आमने-सामने
भारत आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध एकूण 76 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 40 तर भारताने 34 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांत इंग्लंड 24-9 ने आघाडीवर आहे. मात्र 2022मध्ये जेव्हा भारताने शेवटचा इंग्लंड दौरा केला होता तेव्हा हरमनप्रीत कौरच्याच नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडवर एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा फरकाने मात केली.
संघ
इंग्लंड: नॅटली सिव्हर-ब्रंट (कर्णधार), माया बुशेर, सोफिया डन्कली, अॅलिस कॅप्सी, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, टॅमी बोमाँट (यष्टीरक्षक), एम्मा लॅम्ब (यष्टीरक्षक), एमी जोन्स (यष्टीरक्षक), लॉरेन बेल, एमिली अर्लॉट, चार्ली डीन, सोफी एक्लस्टन, लॉरेन फायलर, लिंसी स्मिथ, केट क्रॉस
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रतिका रावल, तेजल हसबनीस, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे
कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल
नॅटली सिव्हर-ब्रंट: डाव्या ‘ग्रॉइन’ला दुखापत झाल्यामुळे शेवटच्या तीन टी-20 सामन्यांना इंग्लंडची ही कर्णधार मुकली. मात्र आता तंदुरुस्त होऊन ती एकदिवसीय मालिकेसाठी परतली आहे. गेल्या काही वर्षांत बॅटने असो किंवा बॉलने, या शानदार अष्टपैलू खेळाडूने प्रभावित केले आहे. एकहाती सामने जिंकून देण्याची अद्भुत क्षमता तिच्याकडे आहे.
सोफी एक्लस्टन: इंग्लंडची ही डावखुरी फिरकी गोलंदाज महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाची गोलंदाज आहे. जवळजवळ 6 फूट उंचीची ही गोलंदाज तिच्या उंचीचा गोलंदाजीत उत्तम वापर करते. ती सामन्याच्या कुठल्याही टप्प्यात गोलंदाजी आक्रमणात येऊन प्रतिस्पर्धी फलंदाजांचा धुव्वा उडवू शकते.
हरमनप्रीत कौर: भारताची ही कर्णधार जरी इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत तिची सर्वोत्तम कामगिरी बजावू शकली नसली तरी, ती एकदिवसीय मालिकेत तिची छाप पाडण्यास उत्सुक असेल. 2022मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध जो पराक्रम केला होता त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा ध्येय ठेवून ती येईल. त्या मालिकेत, या उजव्या हाताच्या फलंदाजाने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 221 धावा केल्या, ज्यामध्ये नाबाद 143 धावांच्या खेळीचा समावेश होता. तिने सर्वाधिक धावा झळकावल्या होत्या.
स्मृती मानधना: या इंग्लंड दौऱ्यात भारताची उपकर्णधार उत्तम फॉर्ममध्ये आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 221 धावा करून, ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. या डावखुऱ्या सलामीवीराकडून तोच टी-20मधील जबरदस्त फॉर्म पुढे एकदिवशीय सामन्यांमध्ये नेण्याची अपेक्षा असेल. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ती जगातील अव्वल क्रमांकाची फलंदाज आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 16 जुलै 2025
वेळ: संध्याकाळी 5:30 वाजता
ठिकाण: रोझ बाउल, साउथहॅम्प्टन
प्रक्षेपण: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क