उल्हासनगर: शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या कॅम्प क्रमांक २ मधील पंडित जवाहरलाल नेहरू स्मारकाची दयनीय अवस्था सध्या चर्चेचा विषय बनली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान आणि देशासाठी अपार योगदान देणाऱ्या नेहरूंच्या स्मारकाकडे महापालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मुख्य बाजारपेठेतील नेहरू चौक परिसर दिवसरात्र व्यापारी गजबजाटाने भरलेला असतो. परिसरात कपडे, भांडी, फटाके आणि हॉटेल्स यांचे मोठे दुकानांचे जाळे असून, चौकात काँग्रेस भवनदेखील आहे. काँग्रेसचे पदाधिकारी येथे नियमितपणे येत असतानाही, स्मारकाची साफसफाई व देखभाल होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. स्मारकाभोवती वाढलेले गवत, साचलेला कचरा आणि दुर्लक्षित अवस्थेतील परिसर हे याचे जिवंत उदाहरण आहे. या स्मारकाच्या मागे काही काळापूर्वी धुरू बिअर बार व लॉजिंग बोर्डिंग होते, ज्यावरून सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र टीका केली होती. सद्यस्थितीत हा बार कायदेशीर कारणांमुळे बंद असला तरीही, स्मारकाच्या देखभालीकडे पालिकेचे आणि स्मारक देखरेख समितीचे दुर्लक्ष कायम आहे.
उल्हासनगर शहरात सुमारे २५ महापुरुष, संत व स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके असून, बहुतेक ठिकाणी देखील असाच हलगर्जीपणा पाहायला मिळतो. हे सर्व पाहता, शहरातील ऐतिहासिक व प्रेरणादायी स्मारकांबाबत महापालिकेची गंभीर अनास्था उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेसचे अध्यक्ष रोहित सालवे यांनी सांगितले की, “पावसामुळे काही दिवसांपासून स्मारकाजवळ पोहोचणे शक्य नव्हते. मात्र, रविवारी आम्ही स्वखर्चाने स्वच्छता मोहीम राबवणार आहोत.”
स्मारकांचा आदर राखण्यासाठी आणि शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नागरिकांनीही महापालिकेवर दबाव टाकण्याची गरज व्यक्त होत आहे.