पलावा पूल सुस्थितीत, वाहतूक सुरळीत सुरू

आमदार राजेश मोरे यांनी केली पुलाची पाहणी

कल्याण : पलावा पूल सुस्थितीत असून या पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी पुलाची पाहणी करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

कल्याण-शीळ रोडवरील पलावा पुलाची पाहणी करत शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी ठाकरे गट, मनसेसह विरोधकांना टोला लगावला. लोकांच्या सोयीसाठी पूल सुरू केला. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार. वाहतूक सुरळीत झाली पाहिजे यासाठी पुलाची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान पुलावर स्टोन क्रशर टाकण्यात आले होते, त्यात पाऊस पडल्याने खड्डे पडल्यासारखे दिसत होते, मात्र प्रत्यक्षात खड्डे पडलेच नव्हते, अशी माहिती आ.मोरे यांनी दिली.

पुलावर खड्डे नाही, अपघात झाल्याची कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाही. विरोधकांनी खोटेनाटे पसरवले होते, त्यामुळे टीकाकारांकडे आम्ही लक्ष देत नाही. पुलाचे उदघाटन झाले नाही, आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केला असल्याचे राजेश मोरे यांनी सांगितले.