कळव्यातील तरण तलावासोबत उभे राहणार कल्चरल सेंटर

आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर

ठाणे : कळवा-खारीगाव भागाचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन मनिषानगर भागातील ३३ वर्षे जुन्या यशवंत साळवी तरण तलावाच्या वास्तुचे नुतनीकरण करताना कल्चरल सेंटर उभे करण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने मंजूर केला आहे.

या जागेवर तरण तलवाचे आरक्षण असल्यामुळे क्लचरल सेंटरची उभारणी करणे शक्य नसल्याने पालिकेने ‘तरण तलाव व कल्चरल सेंटर असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता राज्याच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

यशवंत साळवी तरण तलावाच्या भुखंडाचे एकूण क्षेत्र ४२७० चौ.मी इतके आहे. येथे तळ अधिक एक मजली इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामास ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या तरण तलावाचा वापर कळवा, खारीगाव, ठाणे  परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतो. तसेच याठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही आयोजित करण्यात येतात.

शासनाकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर याठिकाणी क्लचरल सेंटर उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ही वास्तु जुनी झाल्याने त्याचे नुतनीकरण करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली होती.