ठाणे: बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शिताफिने अटक केली आहे. त्याच्याकडून १९ लाख ८१,३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीच्या गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 4 हे करत होते. घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी बाळा जाधव हा उल्हासनगर येथील अमर डाय या बंद असलेल्या कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती, पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव आणि इतर कर्मचारी यांनी मिळून साफळा रचून रोशन जाधव (३४) याला अटक केली.
हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर येथे राहतो. याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून गुन्ह्यामधील सोन्या-चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम असे एकुण 19,81,360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून आणखी आठ गुन्हे उघडकीस आले.