अंबरनाथ: खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी रस्त्यावर पडल्याने दोन विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये आज घडली.
एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा दरवाजा नेताजी मार्केट परिसरात अचानक उघडला गेला. यावेळी धावत्या व्हॅनमधून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले. सुदैवाने पाठीमागे कोणतेही मोठे अवजड वाहन वेगात येत नव्हते. वाहन चालकाला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. विद्यार्थी रस्त्यावर पडल्याचे मागून येणाऱ्या रिक्षा चालकाला दिसले. त्याने तत्काळ विद्यार्थ्यांना उचलले. यामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याप्रकरणी खासगी वाहनचालक सोलमन सकप्पा (३०) आणि केअर टेकर असलेल्या दोन महिलांवर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण आरटीओने अशा प्रकारे अवैध वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅन चालकांवर कारवाई केली होती.