तुर्भेतील वाहन तळाला लागलेल्या आगीत आठ वाहने जळून खाक

नवी मुंबई: तुर्भे सेक्टर २० येथील एस टी बस आगाराच्या जागेत वाहनतळ असूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन इतर व्यवसाय थाटले होते. रविवारी या ठिकाणी मोठी आग लागल्याने या आगीत आठ वाहने जळून खाक झाली. विशेष म्हणजे जवळच बीएआरसी असूनही अतिक्रमणांकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सेक्टर १९ येथील वाहन तळाच्या जागेवर सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे वाहनतळाची निकड पाहता एपीएमसी फळ मार्केटमागील बाजूला सेक्टर २० येथील एस टी महामंडळाच्या जागेवर चालवले जात आहे. मात्र या ठिकाणी हॉटेल, गॅरेज, भंगार दुकाने, तसेच इतर अनधिकृत व्यवसाय चालवले जात आहेत.

याबाबत अनेक तक्रारी करून देखील सिडको आणि मनपा या अतिक्रमणाकडे कानाडोळा करीत आलेली आहे. राववारी रात्री अकराच्या सुमारास येथील एका दुकानात आग लागली आणि क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.

आगीची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरूळ, रबाळे, सीबीडी येथील अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. जवळपास चार ते पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीचे मुख्य कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या आगीत आठ वाहने जळून खाक झाल्याची माहिती वाशी अग्निशमन केंद्र प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली आहे.

बीएआरसी संशोधन केंद्राला धोका?

तुर्भे सेक्टर २० येथील ज्या वाहन तळाला आग लागली, त्या वाहन तळाला लागूनच बीएआरसी म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्राचे प्रमुख संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी अणुऊर्जा आणि संबंधित तंत्रज्ञानावर संशोधन केले जाते. विशेषतः, अणुभट्ट्यांसाठी लागणारे इंधन, तसेच अणु कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षित विल्हेवाट यावर संशोधन केले जाते. त्यामुळे इतक्या महत्वाच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असलेल्या प्रकल्पाशेजारीच अतिक्रमण होऊन आगीची घटना घडल्याने अणुऊर्जा संशोधन केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.