कारवाई रोखण्यासाठी महिलांचा पालिका पथकाला घेराव
ठाणे: न्यायालयाच्या आदेशानुसार मुंब्य्रातील १७ अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू असून आज अतिक्रमण विभागाचे पथक कौसा येथे एका इमारतीवर कारवाईसाठी सकाळी गेले असता महिलांसह रहिवाशांनी प्रचंड विरोध केला. मात्र हा विरोध मोडून काढत दोन इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली.
दिवाजवळील शीळफाटा भागामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यापैकी एका भूखंडावर उभ्या राहिलेल्या 17 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचे कान उपटले आणि 17 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने 13 जूनपासून या इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केली. एका मागोमाग एक १३ इमारती भुईसपाट केल्यानंतर चार इमारतीच्या रहिवाशांनी न्यायालयात कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली. मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता येतील रहिवाशांना आपले बस्तान हलवण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आज संपताच ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाने उर्वरित अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात केली आहे.
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह पालिकेचे पथक आणि पोलीस बळ नियोजित वेळेत खान कंपाऊंड येथे पोहोचले. आज कारवाई होणार याची कल्पना असल्याने रहिवाशी विरोध करण्याच्या तयारीत होते. यावेळी महिला रहिवाशांना पुढे करत पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले की, ‘आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथे राहत आहोत. आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली. इमारत अनधिकृत आहे म्हटल्यावर आम्हाला वीज कनेक्शन का दिले. ही इमारत अनधिकृत आहे यात आमची काय चूक आहे अशी कैफियत त्यांनी मांडली.
३० अनधिकृत बांधकामांवर कारवाई
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण, पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण ३० अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामप्रकरणी एमआरटीपीअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला.
येऊर, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट, नौपाडा, उथळसर, माजिवडा-मानपाडा येथे ही कारवाई करण्यात आली. दिवा येथील १७ इमारतींपैकी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या. तेथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या १३ झाली आहे. तेथे पाडकामास विरोध झाला. अखेर पोलिस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे पाटोळे यांनी सांगितले. दिवा येथील कारवाईच्यावेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आदी उपस्थित होते.
यापूर्वी, या मोहिमेत ३३ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात आणखी ३० बांधकामांची भर पडली आहे. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
विभागनिहाय कारवाई
• नौपाडा-कोपरी – ०३
• दिवा – ०८
• मुंब्रा – ०३
• कळवा – ०१
• उथळसर – ०२
• माजिवडा-मानपाडा – ०७
• वर्तक नगर – ०२
• लोकमान्य नगर – ०२
• वागळे इस्टेट – ०२
• एकूण – ३०