जुन्या ठाण्यातील मलनिस्सारण वाहिन्यांची एन्जिओग्राफी

* ३० वर्षांचे व्हिजन असलेले सादरीकरण
* आमदार संजय केळकर यांचा पुढाकार

ठाणे : मानवी शरीरातील रक्तवाहिनी नादुरूस्त झाली तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून एन्जिओग्राफी करण्यात येते, त्याप्रमाणे ठाणे शहरातील जुन्या, गंजलेल्या आणि नादुरूस्त मलनिस्सारण वाहिन्यांची एन्जिओग्राफी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने एका तंत्रज्ञ सल्लागार कंपनीने ठाणे महापालिकेत पुढील ३० वर्षांचे व्हिजन ठेऊन एक अनोखे सादरीकरण केले आहे.

रस्त्यात चर न खणता मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती आणि नवीन वाहिन्या टाकणारे सीआयपीपी हे परदेशी तंत्रज्ञान दिल्ली, वाराणसी, अहमदाबाद या शहरात वापरण्यात आले. त्यानंतर मुंबईनंतर प्रथमच ठाणे शहरात हे तंत्रज्ञान वापरता येणार आहे. घोडबंदर परिसरासह संपूर्ण जुन्या ठाण्यात गेल्या दोन दशकांत नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. इमारती वाढल्या, १० माणसांच्या जागी २५ माणसे राहू लागली. त्याचा ताण साहजिकच उपलब्ध सुविधांसह मलनिस्सारण वाहिन्यांवर देखील पडू लागला आहे. कासारवडवली, घोडबंदर वगळता उर्वरित जुन्या ठाण्यात म्हणजे कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी, उथळसरसह वागळे भागात ५० वर्षांहून जुन्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत. लोकसंख्या वाढूनही वाहिन्यांचा आकार तेवढाच राहिला आहे. परिणामी त्यावर ताण पडून ती फुटून त्याची गळती होण्याचे प्रकार वाढत आहेत. मेनहोलमधून घाण पाणी बाहेर पडणे, सोसायट्यांमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांची गळती होणे, असे प्रकार वाढत आहेत. अशावेळी पुढील ३० वर्षांत सध्याची लोकसंख्या दुपटीने वाढून समस्याही गंभीर होणार आहे. त्यामुळे पुढील तीन दशकांचा विचार करून सध्या असलेल्या १५० मिमी व्यासाच्या वाहिन्या बदलून त्याजागी २२५ ते २५० मिमी व्यासाच्या वाहिन्या अंथरण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवीन तंत्रज्ञानानुसार वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची गरज नाही. एखादी वाहिनी दुरुस्त करण्यासाठी फक्त मॅनहोलमधून फ्लेक्सिबल ट्यूब टाकण्यात येते. आत वाहिनीमध्ये अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे वाहिन्यांची स्थिती पाहता येते. त्यानंतर फ्लेक्सिबल ट्यूब विशेष प्रक्रियेनंतर स्थायू स्वरूपात करण्यात येते. याच पद्धतीने ट्यूबच्या माध्यमातून वाहिनी तोडून त्याजागी दोन दोन फुटांचे पाईप सरकवत नवीन मोठ्या व्यासाची वाहिनी अंथरता येते. या तंत्रज्ञानामुळे रस्त्यांची हानी होत नाहीच शिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होत नाही.

संबंधित कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोपरी, नौपाडा पाचपाखाडी, उथळसर, वागळे इस्टेट भागात २० किमी लांबीच्या वाहिन्यांची दुरुस्ती किंवा नव्याने टाकण्याची गरज आहे. हा पहिला टप्पा साधारणपणे १८ ते २४ महिन्यांत पूर्ण होऊ शकतो. त्यानंतर इतर भागातही हा प्रकल्प राबवता येईल. यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, उप नगर अभियंता विकास ढोले, मलनिस्सारण विभागाचे नदीम काझी, श्री. सजनानी आणि एन.जी.एस.कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत श्री.ढोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सादरीकरण झाल्याचे सांगून हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर असल्याचे सांगितले.

याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठाण्यात सध्या पाच ठिकाणी ड्रेनेज लाईन बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबतचा प्रस्ताव करण्याची सूचना आयुक्त डॉ.सौरभ राव यांना केली आहे. त्याचबरोबर घोडबंदर परिसरातील नाल्यांची बांधणी अर्धवट असून त्याची बांधणी थेट खाडीपर्यंत नेण्याची गरज आहे. शहरात इतर कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये आणले जातात. मग ड्रेनेज लाईन आणि नाले ही कामे तर मूलभूत स्वरूपाची आहेत. त्यामुळे भविष्यातील सुरक्षित ठाण्यासाठी प्राधान्याने ड्रेनेज लाईन आणि नाले बांधणीसाठी आवश्यक निधी शासनाकडून मिळावा आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे श्री.केळकर म्हणाले.