ठाणेकरांना मिळणार दोन भव्य वाहनतळं

शाहू मार्केट आणि रंगायतन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

ठाणे : शहरात पार्किंगची समस्या जटील बनली असताना ठाणेकरांना आशेचा किरण दिसू लागला आहे. नौपाडा येथिल शाहू मार्केट आणि गडकरी रंगायतन मासुंदा तलाव परिसरात ठाणेकरांना लवकरच हक्काची दोन नवीन वाहनतळं उपलब्ध होणार आहेत.

रंगायतन येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या भुखंडावर प्रस्तावित असलेल्या या वाहनतळासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला असून कामाचा कार्यादेश देखिल देण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वाहनतळाचे भूमीपूजन आचारसंहिता लागण्याच्या आधी करण्याचे नियोजन आहे. सुमारे ४९९ दुचाकी आणि ३०८ चारचाकी वाहन क्षमता असणारे हे वाहनतळ भूमिपूजन होताच दोन ते अडीच वर्षात सुरू होणार आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. शेजारी मासुंदा तलाव आणि मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. गडकरी रंगायतनमध्ये वाहनतळाची सुविधा असली तरी मासुंदा तलाव परिसरात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने दहा वर्षांपूर्वी राम गणेश गडकरी रंगायतन शेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. भुखंड हस्तांतरणावरून वाद निर्माण झाल्याने हा प्रकल्प रेंगाळला. पण अखेर आता त्याला मूर्त स्वरुप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत गेल्यावर्षी मंत्रालयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भुखंडाची अडचण दूर करण्यात आली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून आता हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डरही ठेकेदाराला देण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या आधी या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र तळ उभारण्यात येणार आहेत. सुमारे २१९३.३६ चौरस मीटर भुखंडावर नवीन पार्कींग टॉवर बांधण्यात येणार आहे. तळ अधिक सात मजली टॉवरमध्ये दुचाकी वाहनांसाठी पार्कीग व्यवस्था असणार आहे. तळ मजल्यापासून ते पाचव्या मजल्यापर्यंत सुमारे ४९९ दुचाकी वाहने उभी राहतील अशी पार्कींग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर दुसर्‍या टॉवरमध्ये तळ अधिक २७ लेव्हल्समध्ये ३०८ चारचाकी वाहने उभी राहतील व्यवस्था करण्यात येणार आहे.

कॅफेटेरिआ, व्हिविंग गॅलरी

दुचाकी वाहनतळाच्या सहाव्या मजल्यावर कॅफेटेरिआ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कॅफेटेरिआमध्ये येणार्‍या ठाणेकरांना मासुंदा तलावासह शहराचे सौंदर्य दिसावे यासाठी सातव्या मजल्यावर व्हिविंग गॅलरीही बांधण्यात येणार आहे.

प्रचंड वर्दळीचे ठिकाण असलेल्या शाहु मार्केटमध्ये पार्कींग प्लाझा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी एक पाच मजली आणि दुसरी १६ मजली अशा स्वरुपाची इमारत उभारली जाणार आहे. जी १६ मजल्यांची इमारत आहे, त्याठिकाणी मॅकेनिकल पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मॅकेनिकल पार्कींगचे तब्बल १६ मजले असणार असून प्रत्येक मजल्यावर १६ चारचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था असणार आहे. त्यानुसार तब्बल ३२० चारचाकी वाहनांना उभे करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तर तळघरात २४७ दुचाकींच्या पार्कींगची व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

पूर्वी या ठिकाणी महापालिकेचे नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय होते. तसेच सुमारे ८० हून अधिक गाळे देखील येथे आहेत. आता नव्या इमारतीत तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर येथील बाधितांचे पुनर्वसन केले जाणार आहे. खालील बाजूस देखील महापालिका गाळे बांधणार आहे. तसेच पाचव्या माळ्यावर महापालिकेचे कार्यालय असणार आहे. या ठिकाणी १६६५ चौरस मीटर जागा उपलब्ध असून बांधकाम झाल्यावर तीन हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. त्यानुसार मॅकेनिकल पार्कींगचे तब्बल १६ मजले असणार असून प्रत्येक मजल्यावर १६ चारचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था असणार आहे. त्यानुसार तब्बल ३२० चारचाकी वाहनांची पार्कींग येथे उपलब्ध होणार आहे. अप्पर आणि लोअर बेसमेंट येथे असणार असून त्याठिकाणी २४७ दुचाकी पार्कींगची व्यवस्था उपलब्ध असणार आहे. यासाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित असून शासनाकडून सध्या २० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.