उद्यापासून निवडणूक विभाग कामाला
ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढणार नाही, परंतु मतदारांची संख्या १० ते १५ हजारांनी वाढण्याची शक्यता असून मंगळवार २४ जूनपासून गुगलवर प्रत्यक्षात प्रभागाच्या रचनेच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील ठाणे महापालिकेसह अन्य महापालिकांच्या प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाने जाहीर केला आहे, त्यामुळे ठाणे महापालिकेच्या गुगल नकाशावर प्रत्यक्षात प्रभाग रचना करण्याचे काम २४ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. ३० जूनपर्यंत प्रभाग रचना तयार केली जाणार आहे १ ते ३ जुलैपर्यंत प्रत्यक्ष जागेवर जाऊन महापालिका आयुक्त तसेच महापालिकेतील निवडणूक विभागाचे अधिकारी हे पाहणी करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. १० जुलै रोजी तयार करण्यात आलेला नकाशा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे तर २२ जुलै रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव, यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, शहर विकास विभागातील अधिकारी यांची समिती तयार करण्यात आली असून प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
महापालिकेच्या निवडणुकीत २०१७ ला १३१ नगरसेवकांचे चार सदस्य पॅनेल पद्धतीने ३३ प्रभाग होते. सर्वोच्च न्यायालयाने २०१७च्या पद्धतीने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रभाग रचना तयार करताना ठाणे महापालिकेला २०११च्या जनगणनेचा आधार घ्यावा लागणार आहे. प्रभाग रचना त्यानुसार होणार आहे, परंतु मतदारांची यादी मागिल वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यादी प्रमाणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागिल निवडणुकीत मतदारांची संख्या जास्तीत जास्त ४५ हजार इतकी होती, ती या निवडणुकीत वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा मतदारसंघात सुमारे ३० ते ५० हजार इतकी मतदार संख्या वाढली असल्याने महापालिका निवडणुकीत देखिल मतदारांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात किमान पाच हजार मतदार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.