संदीप माळवी एसआरएचे प्रभारी सीईओ

ठाणे: ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची बदली झाल्यामुळे सध्या हा पदभार संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुरुवारी एसआरएच्या कार्यालयात जाऊन त्यांनी हा पदभार स्वीकारला.

मुंबई महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील एसआरएच्या योजना राबवण्यासाठी स्वतंत्र एसआरए विभागाची स्थापना करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत योजना राबविण्यासाठी यापूर्वी ठाणेकरांना मुंबईच्या खेपा माराव्या लागत होत्या. ठाण्यातच एसआरएचे कार्यालय सुरु व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे मुंबई वगळून इतर क्षेत्रासाठी एसआरए विभागाचे ठाण्यातच कार्यालय सुरु करण्यात आले. तसेच स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे इतर क्षेत्रातील अनेक एसआरएच्या योजनांना गती मिळाली.

एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी २०२३ पर्यंत पराग सोमण यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्य शासनाकडून त्यांची बदली झाल्यामुळे हे महत्वाचे पद रिक्त होते. आता या पदावर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला. संदीप माळवी यांना प्रशासकीय कामाचा दीर्घ अनुभव असल्याने एसआरएच्या योजनांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.