टिटवाळ्यातील चाळींमध्ये पुन्हा शिरले गटाराचे पाणी

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कल्याण: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टिटवाळा पश्चिमेतील आझाद नगर भागात पुन्हा एकदा गटाराचे दुर्गंधीयुत पाणी शिरुन कहर सुरू झाला आहे. ड्रेनेज यंत्रणेचा अभाव, अनधिकृत चाळींच्या वाढत्या संख्या, आणि प्रशासनाचा सावळा गोंधळ कारभार यामुळे चाळीतील नागरिकांच्या घरात थेट गटाराचे सांडपाणी मिश्रित पाणी शिरत असून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे संभाव्य नागरी आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

ड्रेनेज लाईनचा अभाव असलेल्या या भागात दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या उद्भवत असून, यंदा देखील गटाराचे सांडपाणी थेट घरात घुसल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.

याबाबत मलनिसारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवागुळ यांनी सांगितले की काही ठिकाणी ड्रेनेजलाईनवर लोकांनी चाळी बांधलेल्या आहेत, त्यामुळे सफाईसाठी अडचणी येत आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, चाळी हटवण्याबाबत सहाय्यक आयुक्तांना अहवाल देण्यात आला आहे. तसेच सध्या तुंबलेल्या ड्रेनेज लाईनच्या सफाईचे काम असणारा जुना ठेका रद्द केला असून नव्याने कामाच्या ठेक्यासाठी निविदा देण्यात आलेल्या आहेत. याबाबतच्या काही तांत्रिक बाबींवर अभ्यास चालू असून येत्या आठवड्याभरात ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी अधिक कार्यक्षमता असलेल्या गाड्या सेवेत रुजू होतील, असे सांगण्यात आले. आज टिटवाळा येथे सावरकर नगर, नांदप रोड, सिद्धिविनायक कॉलनी, एक नव्याने गाडी काम करण्यासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले तर सध्या उपलब्ध असलेली यंत्रणा ही अपुरी असून ती अधिक चांगल्या पद्धतीने कार्यक्षम करण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

आझाद नगरसह टिटवाळ्याच्या अनेक भागांत गटार सफाई, मलनिसारण यंत्रणा आणि पावसाळी पूर्वतयारीसंबंधीची दिरंगाई नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. प्रशासकीय सावळा गोंधळ कारभाराचे सर्वोत्तम उदाहरण असल्याची टीका यानिमित्ताने सर्वसामान्य करदात्या नागरिकांकडून केली जात आहे.