आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा…!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई: आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे असे म्हणत सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षाचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, हिंदुत्वाचा भगवा आपल्याकडे आहे. शिवधनुष्य आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशिर्वाद देखील आपल्याकडे आहे. आपल्या पक्षात जी वाढ होत आहे, ही सर्वांच्या मेहनीची आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याचेच हे प्रतिबिंब असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला, मात्र या लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचा विश्वासघात केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. मुख्यमंत्रीपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. हिंदुत्वाची आम्ही कधी प्रतारणा करणार नाही. काही लोकांना निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची आठवण येते. एरव्ही हम दो हमारे दो असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली.

बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचा हिशोब द्या असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सवाल केला. आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट तुम्ही का म्हणत नाही असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी केला. हिंदुत्व आमचा श्वास आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, कमॉन कील मी पण मी म्हणतो मेलेल्या माणसाला काय मारणार. महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

श्री.शिंदे पुढे म्हणाले, वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, त्यासाठी वाघाचे काळीज आणि मनगटात जोर लागतो. तो दम शिवसैनिकात आहे. आमच्या नादाला तुम्ही लागू नका. तुमचा टांगा पलटी घोडे फरार आम्ही केले आहेत. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा कार्यकर्ता मी असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.