आमदार संजय केळकर करणार लढ्याचे नेतृत्व
ठाणे: चितळसर मानपाडा येथील महाराष्ट्रनगरचा पुनर्विकास गेली १५ वर्षे रखडला असून विकासकांनी गेल्या ३३ महिन्यांचे भाडे देखील थकवले आहे. केवळ तारखा देत चालढकल करणाऱ्या विकासकांविरुद्ध रहिवाशांनी आता एल्गार पुकारला आहे. त्यांनी व्यथा मांडल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रनगरमधील ३४८ कुटुंबे हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. २०१० साली सुरू झालेली पुनर्विकासाची प्रक्रिया अद्याप अपूर्ण असून सुमारे ३३ महिन्यांचे भाडे विकासक कंपनीने थकवल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. हक्काच्या घराचे स्वप्न पाहत येथील ५० रहिवाशांनी इहलोक सोडला, पण विकासक अजूनही सातत्याने तारखा देत आहे. सध्या बांधकाम पूर्णपणे बंद असून रहिवासी हवालदिल झाले आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली.
आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली विकासकाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना श्री.केळकर म्हणाले, ठाण्यात विकासकाकडून फसवणुकीचे प्रकार वाढत असून काही प्रकल्प मार्गी लावण्यात आम्हाला यश आले आहे. काही विकासकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रनगरच्या रहिवाशांच्या मी पाठीशी असून त्यांना घरे मिळेपर्यंत मी प्रयत्नशील राहीन. या प्रकरणी येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रनगर पुनर्विकासाचा मुद्दा मांडणार असल्याची माहितीही श्री. केळकर यांनी दिली.