दिवसाढवळ्या बुजवली जात आहे मुंब्र्याची खाडी

मुंब्रा, दिवा, साबे गाव पाण्याखाली बुडणार; आ.आव्हाड यांची भीती

ठाणे : मुंब्रा आणि दिवा दरम्यान असलेली खाडी बेकायदेशीरपणे चक्क पोलीस संरक्षणातच बुजवली जात आहे. या खाडीला बुजवण्यासाठी शेकडो डंपर रोज माती टाकत असूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंब्रा, दिवा, साबे गाव पाण्याखाली बुडणार असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

साबे आणि दिवा या गावातील खाडीलगत असलेल्या जमिनी तेथील गरीब शेतकरी कसत होते. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात पोलीस आले अन् संपूर्ण जमिनीवर कब्जा घेतला. त्या दिवसापासून हजारो डंपरमधून खाडी आणि परिसरात माती टाकली जात असून सपाटीकरणासाठी सहा पोकलेन आणि अनेक जेसीबी काम करीत आहेत. या जेसीबी, पोकलेन आणि डंपरचे संरक्षण करण्यासाठी रात्री ५० पोलीस तैनात असतात, अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

या ठिकाणी करण्यात येत असलेली भरणी अनधिकृत असून उच्च न्यायालयाने हा परिसर सीआरझेडमध्ये समाविष्ट असल्याचे घोषित केले आहे. तरीही या ठिकाणी खारफुटी ची बेकायदेशीर भराव केला जात आहे. ऐन निवडणुकीत हे काम कोण करतंय, याबाबत प्रशासनातील कोणतेही अधिकारी बोलायला तयार नाहीत. पोलिसांना विचारणा केल्यास पोलीस, ‘वरून आलंय’, असे सांगतात. “वरून” हा शब्द ठाण्यात सुरू झालाय; तो वरून हा शब्द कुठून येतो, हेच कळत नाही. हे सर्व संशयास्पद तर आहेच; पण, त्याहीपेक्षा ते अतिशय धोकादायक आहे. कारण, यामुळे सबंध मुंब्रा, दिवा पाण्यात जाणार आहे. १२ ते १५ फूट पाणी भरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, असेही आ.डाॅ. आव्हाड यांनी सांगितले.

विटावाही धोक्याच्या सीमेवर

कळवा प्रभाग समितीमधील विटावा भागातही खाडीमध्ये खारफुटी तोडून, मातीचा भराव टाकून मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यावर अनधिकृतपणे चाळींचे बांधकाम सुरू आहे. तर दिवसाढवळ्या अनधिकृत इमारतींचे बांधकामही सुरू आहे. याबाबत तक्रारी करूनही प्रभाग समितीमार्फत कारवाई करण्याचे टाळले जात असल्याचे दिसून येत आहे.