फेरीवाले आक्रमक; उपायुक्तांनी आरोप फेटाळले
कल्याण : कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाईची अधून-मधून प्रशासनाला आठवण येत असल्याने फेरीवाल्यांवरील धाक कमी झाला आहे. स्टेशन परिसरात गॉगल्स विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला मारहाण करत त्याच्या मालाची पालिका उपायुक्त अवधूत तावडे यानी नासधूस केल्याची तक्रार फेरीवाला संघटनेने पोलिसांकडे केली आहे.
या तक्रारीत संबधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. मात्र तावडे यांनी संबधित फेरीवाल्याला मारहाण केली नसल्याचे सांगत फेरीवाल्यावर नियमानुसार कारवाई केल्याचे सांगितले.
बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास स्टेशन परिसरात फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे देखील उतरले होते. स्टेशन परिसरात कारवाई सुरु होताच फेरीवाल्यांकडून आपला माल लपविण्यास सुरुवात झाली. याच दरम्यान स्टेशन परिसरात गॉगल्स विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या इमरान कुरेशी या फेरीवाल्याचा पाठलाग करत त्याला मागून धक्का देत लाथ मारत तावडे यांनी त्याच्या मालाची नासधुस केल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कैद झाला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश पथारी सुरक्षा दल आणि महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस प्रशासनाला निवेदन देत संघटनेने तावडे यांच्यावर कारवाई न झाल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आपण पालिका आयुक्ताकडे तसेच अतिरिक्त आयुक्ताकडे तक्रार करण्यासाठी गेलो असता कोणीही अधिकारी दालनात नसल्याने आपण पोलिसात तक्रार केल्याचे संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी सांगितले.