यशोधननगर बस थांबा नसल्याने प्रवाशांचे हाल
ठाणे : १५ दिवसांपूर्वी एका टेम्पोच्या धडकेने यशोधननगर बस थांबा उखडला गेला. मात्र नव्याने थांबा उभारण्याबाबत परिवहन सेवेने स्वारस्यच दाखवले नाही, त्यामुळे भर उन्हात प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत आहे.
सध्या उन्हाचा कडाका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. वाढत्या उष्णतेचा त्रास ठाणेकरांना होऊ नये म्हणून महापालिकेने पाऊले उचलली आहेत. असे असले तरी परिवहन सेवेने बस प्रवाशांना भर उन्हात बसची वाट पाहण्याची वेळ आणल्याने संताप व्यक्त होत आहे.
यशोधन नगर येथील बस थांबा १५ दिवसांपूर्वी एका टेम्पोच्या धडकेत जमीनदोस्त झाला. तेव्हापासून हा थांबा उभारण्याबाबत परिवहन सेवेने हालचाल केली नाही. उन्हाचा कडाका वाढला असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांना उन्हाचे चटके सहन करत बसची वाट पाहावी लागत आहे.
याची दखल घेत स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे ठाणे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हा बस थांबा लवकरात लवकर बसविण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय देवकर तसेच राजीव शिरोडकर, प्रमिला भांगे, रेश्मा देवकर, सविता धुमाळ, हेमांगी पांचाळ, नारायण भालेकर, दिनेश शेट्ये, शाहू कदम, विजय सावंत, बाळा परब, बाळा भाट आदी उपस्थित होते.