स्मार्ट वॉचमुळे लोकेशन सापडले; रिक्षात राहिलेले सात तोळे सोने मिळाले

आठ दिवसांनंतर लागला रिक्षाचालकाचा शोध

ठाणे : पनवेल येथे राहणाऱ्या एका नव दाम्पत्याचे सात तोळ्याचे सोने असलेली बॅग ठाण्यातील रिक्षात राहून गेले होते. शोध घेतल्यानंतरही रिक्षाचालक सापडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तब्बल आठ दिवसांनी या रिक्षाचालकाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे त्या बॅगेत असलेल्या स्मार्ट वॉचमुळे पोलिसांना लोकेशन सापडले दाम्पत्याला हायसे वाटले.

पनवेल येथे राहणारे देवेंद्र पाटील आणि प्रांजली पाटील हे नव दाम्पत्य कापूरबावडी येथे आपल्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आले होते. घरचा कार्यक्रम आटपून २१ मार्च रोजी त्यांनी कापूरबावडी येथुन ठाणे स्थानक येथे जाण्यासाठी रिक्षात बसले. त्यांनतर ठाणे स्थानक येथे उतरल्यानंतर रिक्षात मागे ठेवलेली सुटकेस बॅग विसरली असल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी स्टेशन स्टँड परिसरात रिक्षाची शोधाशोध सुरू केली. मात्र ज्या रिक्षाने प्रवास केला ती रिक्षा कुठेच दिसत नसल्याने त्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली. या बॅगेत सुमारे सात तोळ्याचे (७० ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक घड्याळ, कपडे आणि मौल्यवान वस्तु होत्या. त्यानंतर ठाणे पोलीस तब्बल पाच दिवस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपास सुरू ठेवला. दरम्यान, बॅगेत स्मार्ट वॉच असल्याचे प्रांजली पाटील यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितले. या घड्याळावरून एरोली येथील यादव नगर येथे लोकेशन मिळाले. त्यांनतर रबाळे पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव (नेमणूक नियंत्रण कक्ष ठाणे शहर ) यांनी एकत्रीत तपास करून रिक्षाचालकाचा शोध लावला.

पोलिसी खाक्या दाखवताच उत्तर प्रदेशातून थेट ठाण्यात

ज्या रिक्षात बॅग विसरली तो रिक्षाचालक उत्तरप्रदेश येथील मिर्झापूर या आपल्या मूळ गावी सोने घेऊन गेला होता. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर रिक्षाचालक रमेश यादव याने सोने माझ्याकडेच असून मी मुंबईला येतो असे सांगितले. दरम्यान चार लाखांचे सोने नव दाम्पत्याला पुन्हा परत मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील आणि पोलिस उपनिरिक्षक प्रविण जाधव यांचे पाटील कुटुबियांनी आभार मानले.