ठाणे: शुद्ध पर्यावरणीय वातावरणासाठी विशिष्ट सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांची मंत्रोच्चारात अग्नीमध्ये आहुती देण्याची ‘अग्निहोत्र’ ही प्रभावी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले आहे.
कोकण ग्रामविकास मंडळाच्या शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात आमदार संजय केळकर हे स्वतः नियमित ‘अग्निहोत्र’ आचरण करीत आहेत. शुक्रवारी अग्निहोत्र केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ. केळकर यांनी अग्निहोत्र विधीची महती विषद केली. मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांच्याप्रमाणे सामाजिक भान ठेवून असे ‘पर्यावरणाभिमूख अग्निहोत्र’ उपक्रम इतरांनीही आयोजित करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सीताराम राणे व परिवहन सदस्य विकास पाटील यांनीही अग्निहोत्र केले.
ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य मालवणी महोत्सवात मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच रसिक खवय्यांकरीता खाद्यपदार्थाचे स्टॉल आणि भाविकांसाठी ‘अग्नीहोत्र’ विधी उपलब्ध केले आहेत. आयोजक सीताराम राणे यांच्या संकल्पनेतुन अक्कलकोट येथील शिवपुरीच्या विश्व फाऊंडेशनच्या माध्यमातुन मालवणी महोत्सवात दररोज अग्निहोत्र करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
याशिवाय अग्निहोत्रसाठी लागणाऱ्या सामुग्रीचा स्टॉल देखील महोत्सवात उपलब्ध आहे. ठाण्याचे जनसेवक आ. संजय केळकर हे देखील मालवणी महोत्सवात दररोज ‘अग्निहोत्र’ करीत आहेत. शुक्रवारी अग्निहोत्र आचरण केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ.केळकर यांनी, या अग्निहोत्र उपक्रमामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन ऑक्सिजनमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे कार्बनडाय ऑक्सॉईडचे प्रमाण देखील कमी होते व याला जागतीक स्तरावर शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मान्यता दिली असल्याचे सांगितले.