ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उजव्या डोळ्यावर ठाण्यातील वावीकर रुग्णालयात शुक्रवारी मोतीबिंदूची अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी सकाळी मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर वावीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर तासाभरात त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांना दोन दिवस सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी वावीकर रुग्णालयात डोळे तपासणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेसाठी ते सकाळी साडेआठ वाजता पत्नी लता शिंदे यांच्यासह रुग्णालयात दाखल झाले. अवघ्या आठ मिनिटात ही शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पूर्ण झाली. त्यानंतर पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी अमेरिकन कंपनीच्या लेन्सचा वापर करण्यात आल्याने त्यांच्या चष्म्याचा नंबर कमी होणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांना कोणतेही इंजेक्शन दिले नव्हते. भूल देण्यासाठी डोळ्यात केवळ औषधाचे थेंब टाकण्यात आले होते, असे डॉ. वावीकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री सातत्याने दौरे, दिवसभरातील व्यस्त कार्यक्रम यामुळे राज्यभरात फिरतीवर असतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असून तिथूनच ते महत्त्वाचे कामकाज करत आहेत.
ठाण्यातील अग्रगण्य डोळ्यांचा दवाखाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या वावीकर आय इन्स्टिट्यूटने आत्तापर्यंत अनेक लेनसेक्स शस्त्रक्रिया पूर्ण करुन एक नवीन विक्रम केला. या कामगिरीसाठी त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलही घेण्यात आली आहे. आय केअर विश्वातील सर्वोत्कृष्ट समजली जाणारी कंपनी एलकॉनकडून वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर यांचा सत्कारही करण्यात आला होता.
गेली तीन दशके रुग्णांना सेवा पुरवणाऱ्या वावीकर आय इन्स्टिटयूटने आजवर लाखो रुग्णांचा उपचार यशस्वीपणे केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आणि रुग्णांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून डॉ. वावीकर आणि त्यांची संपूर्ण टीम रुग्णांना उत्तम सेवा देत आहे.
आशिया खंडात पहिली ब्लेडलेस लेनसेक्स लेजर कॅटरॅक्ट सर्जरी करण्याचा मान वावीकर आय इन्स्टिट्यूटने मिळवला आहे. याआधी ठाण्यात पहिले लॅसिक मशिनदेखील त्यांनी आणले ज्यामुळे ठाण्यातील असंख्य रुग्णांना त्याचा फायदा झाला.
डॉ. वावीकरांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ठाणेकरांची सेवा नियमितपणे करण्यासाठी त्यांना ठाणे गौरव पुरस्कार देण्यात आला. सामाजिक काम करण्यात देखील ते कायम अग्रेसर असतात. पहिले मोबाईल आय क्लिनिक ठाण्यात त्यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले होते.