कल्याण : कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील रात्रीपासूनच ज्युपीटर रूग्णालयात उपस्थित आहेत. तर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकीय वाद सुरू आहे. त्यातच जमिनीच्या एका जुन्या प्रकरणात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड दोघे आले होते. मात्र या चर्चेचे रूपांतर आधी बाचाबाचीमध्ये होऊन नंतर गोळीबार होण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर काल रात्रीपासून कल्याण पुर्वेमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून आले.
दरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना सुरुवातीला उल्हासनगरमधील मीरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही वेळाने ठाण्यातील ज्युपीटर रूग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.
“पोलिस स्टेशनमध्ये आपल्या मुलाला धक्काबुक्की झाली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला गेला असून माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर स्वसंरक्षणार्थ आपण गोळीबार केल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले.
महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले असून तातडीने ऑपरेशनद्वारे या गोळ्या काढण्यात आल्या आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधी आणि आमदाराकडून असे कृत्य हे घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
कल्याण पूर्व विभागाचे शिवसेनेचे शहर प्रमुख असलेले महेश गायकवाड आणि भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात राजकीय वाद असल्याने या दोघांमध्ये हाडवैर असल्याचे या मतदारसंघातील जाणकार मतदारांना माहीत आहे. तसेच तो येथील पोलीस प्रशासनालाही अवगत आहे.
कल्याण पूर्व या मतदार संघातील शासकीय निधीतून होत असणाऱ्या नागरी विकास कामाच्या उद्घाटनाला आपणास जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी केला होता. नागरी कामांवरून दोन्ही गायकवाडांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुसफूस निर्माण झाल्याचे समोर येत आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अगदी खासम खास आणि मर्जीतील म्हणून महेश गायकवाड यांच्याकडे बघितले जात असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान उमेदवार म्हणून त्यांचे नाव येथे घेतले जात आहे.
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सरवणकर या दोघांना अटक केली. आमदारांना अटक करत कळवा पोलिस स्टेशनला नेण्यात आले होते. गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर न करता व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळत आमदार गायकवाड यांना कोर्टात हजर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आमदार गायकवाड यांना पोलिस बंदोबस्तात हजर केले असता न्यायालयाने गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.