भाईंदर: रविवारी आणि सोमवारी मीरा रोडमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दोन समाजातील तणावाच्या स्थितीत काही शहराबाहेरील राजकीय नेत्यांच्या आगमनास समाज माध्यमावरील व्हायरल आक्षेपार्ह संदेश वातावरण बिघडवित आहेत, असा सूर गुरुवारी नगरभवन येथे पालिका सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उमटला.
या बैठकीत आ.गिता जैन, आ.प्रताप सरनाईक, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पालिका आयुक्त संजय काटकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदविला. मीरा रोडच्या नयानगर भागात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता नांदावी या उद्देशाने पत्रकारांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला माजी आमदार मुझफ्फर हुसेन, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर, उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, महापालिकेचे आयुक्त संजय काटकर आदी उपस्थित होते.
मीरा रोड येथील घटनेसंदर्भात समाजमाध्यमांवर अनेक खोटे संदेश, चित्रफिती प्रसारित केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे शहराबाहेरील नेते दौरे करून प्रक्षोभक वक्तव्ये करीत असल्याने तणावात आणखीन भर पडत आहे. आजपर्यंत शांत असलेल्या शहराला या घटनेने गालबोट लागले आहे. हा लागलेला कलंक पुसण्याचे जबाबदारी राजकीय नेत्यांचीच असल्याने या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन पालिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे व भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती न होण्यासाठी खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.